भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली आहे. कालच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
चव्हाण यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. मात्र, मेधा कुलकर्णी यांच्या नावाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉ. अजित गोपछडे यांची तर लॉटरीच लागली आहे. अजित माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असमार्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. १९९२ साली वादग्रस्त बाबरी ढाचा पाडण्यात आला त्यावेळी ते कारसेवक होते. बाबरीच्या घुमटावर भगवा झेंडा फडकावित असतानाचे त्यांचे फोटोही व्हायरल होऊ लागले आहेत.
अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल,अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली. मेधा कुलकर्णी यांचे नावही अचानक आले आहे. सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. त्यांना आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून पुण्यातील ब्राम्हण समाजाची कथित नाराजीही भाजपने दूर केली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जांगांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
