राज्यातील तरुणांसाठी चांगली बातमी आली आहे. राज्याच्या पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या युवकांना चांगली संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. 2024 मध्ये ही मेगा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या पोलीस दलातील मनुष्यबळ आहे. परंतु आता नवीन आकृतीबंध तयार केला गेला आहे. या आकृतीबंधानुसार भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक यापदांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे.
लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल, असे नियोजन असल्याची माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळ या वृत्तपात्राशी बोलताना सांगितले.राज्याची विशेषत: प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी असणार आहे. शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.
राज्यातील 10 पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता 26 फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल. त्यानंतर जून-जुलैमध्ये सर्वांचीच एकाचवेळी परीक्षा होईल. पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैत घेतली जाणार आहे.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गृह विभागाचे त्यादृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यात जवळपास राज्यातील 17 हजार रिक्त पदे असतील.
