देवेंद्र फडणवीस आणि ब्राम्हण समाजाला गाडण्याची भाषा करणाऱ्या योगेश सावंत याला सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी फोन केला. सावंत याचे रोहित पवारांशी संबंध आहेत असा गंभीर आराेप आमदार राम कदम यांनी केला.
आमदार कदम म्हणाले, काही दिवसांपासून एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये योगेश सावंत नावाचा एक इसम मांडीवर थाप मारून म्हणतोय की फडणवीस तू कितीही आरएसएसचा असलास तरी…. त्याने येथे घाणेरडी शिवी दिली आहे. पुढे तो म्हणतो की देवेंद्र फडणवीससारखे महाराष्ट्रातील सगळे ब्राम्हण आम्ही तीन मिनिटांत संपवून टाकू.आमच्यावर काय गुन्हे नोंदवायचे ते नोंदवा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार.
राम कदम म्हणाले, पोलीस स्टेशनमधऊन माहिती घेतली असता योगेश सावंत या व्यक्तीचे सगळे संबंध हे बारामतीशी आहे. बारामती येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला या सभागृहातील शरद पवार गटाचा आमदार रोहित पवार फोन करतो आणि सांगतो सोडून द्या. काय संंबंध आहे? रोहित पवारांचा त्याच्याशी काय संबंध आहे. मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हाला बदनाम करत आहे.
आमदार राजेश टोपे यांच्यावरही हल्लाबोल करताना राम कदम म्हणाले, मराठ्यांचे सगळे मोर्चे शांततेत झाले. फक्त एका ठिकाणी दगडफेक झाली. शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यावर बैठक झाली. कोणी दगड पुरवायचे? कोणी मारायचे? मारल्यानंतर मराठा समाज कसा बदनाम होईल याचे षडयंत्र रचले गेले.
महाराष्ट्रात कोणाला कोणाला जातीयवाद पसरवायचा आहे? असा सवाल करून राम कदम म्हणाले, देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देवमाणूस आहे. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
