मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची वेळ आली आहे. कल्याणसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार त्यातच भूमिपुत्रांना उमेदवारी देऊन महायुतीची कोंडी करण्याची व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जात आहे.
मतदारसंघांतील अनेक बडे पदाधिकारी आणि नेते कल्याणमधून निवडणूक लढण्यास नकार देत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मतदारसंघांबाहेरच्या उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आले आहे. आता केदार दिघे उमेदवारी घेणार का? हा प्रश्न आहे.
स्थानिक भूमीपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असून केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पहावे लागेल.
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान तसे कमी होते. त्यामुळे निवडणुका जाहीर होऊन आठवडा लोटला तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही जागा असल्याने त्यांच्याकडून या जागेवर उमेदवार दिला जाणार आहे. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार असले तरी सध्या शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा असल्याचं मानलं जात. राज्यभर प्रचारासाठी श्रीकांत शिंदे यांची गरज पक्षाला भासणार.
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात विरोधकांना उमेदवार मिळत नाही. त्याचवेळी श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या बैठका, प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देशात चारशे पार तर महाराष्ट्रात 45 पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे म्हटले आहे.
