सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम आहे. मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अंतिम जागावाटप जाहीर केले. तरीही सांगलीमधील नेत्यांना हा निर्णय रुचला नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जागावाटपात सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मविआने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत स्थानिक परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी बाबत फेरविचार करावा, अशी मागणी सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केली आहे. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने फेरविचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष भक्कम असून लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे सांगली मधील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची ही भावना असल्याचे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जागे बाबत महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
विश्वजीत कदम म्हणाले, जागावाटपावर तीन महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही आग्रही होतो. स्थानिक ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. अनेक ग्रामपंचायती काँग्रेसला मानणाऱ्या आहेत. ही काँग्रेस पक्षाची मजबूत बाजू आम्ही दाखवली.कोल्हापरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढायची होती. त्यामुळे ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. सांगलीतील चंद्रहार पाटील यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. आमच्या राज्यातील नेत्यांनी हा एकतर्फी निर्यण असल्याचे देखील म्हटले आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितले.
