पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबईभाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.”उद्धव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली. तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड (पश्चिम ), अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व ) एन.एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.
मुंबई शहरातील नालेसफाईच्या पाहणीचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. आता उत्तर मुंबई या विभागात आणि दहिसर नदीवर पाहणी करण्यासाठी आम्ही जात आहोत. प्रत्यक्षात महापालिका नालेसफाईची जी आकडेवारी सांगत आहे आणि प्रत्यक्षात नाल्यांमध्ये असलेला गाळ याचा मेळ बसत नाही. त्यामुळे कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका आणि कंत्राटदार जो पर्यंत १०० टक्के काम करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष याचा पाठपुरावा करेल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महापालिकेने नालेसफाईसंदर्भातील प्रेझेंटेशन दिले आहे. त्यामुळे तुम्ही या कामावर समाधानी आहात का? या प्रश्नावर बोलताना आशिष शेलार म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीचे स्वागत करतो. जबाबदार मुख्यमंत्री आणि बेजबाबदार मुख्यमंत्री या मधील हा फरक आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते वर्षा निवासस्थानी बसून नाल्यांवर फिरत होते. घरात बसून ते नालेसफाईबाबत माहिती घ्यायचे. त्यामुळे बेजबाबदार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम केलं, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
नालेसफाई होताना उबाठाचा माणूस दिसला का? कुठल्या बिळात लपून बसलात? मुंबईवर यांचे पुतणा मावशीचे प्रेम आहे. मुंबईवर प्रेम आहे म्हणता ना मग लंडनमध्ये का लपून बसेलत उद्धवजी आदित्यजी याचे उत्तर अनिल परबांनी द्यावे, असे थेट आव्हान शेलार यांनी दिले. ही श्रेयवादाची लढाई नसून ही मुंबईकरांना श्रेयाची लढाई आहे, असे देखील आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितले.
