कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात आता आखणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेसह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार केल्याचा प्रकार समोर आला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलंय. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाईल. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आज पत्रकार परिषदेत कारवाईची सविस्तर माहिती देणार आहेत.
घटनेच्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याची आलिशान पोर्शे कार चालवत होता. त्याने पुण्याच्या कल्याणीनगर भागातील अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात पोर्शे चालवून दुचाकीवर बसलेल्या दोघांना उडवलं. यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. हा गुन्हा करण्याआधी आरोपी दारु प्याला होता. तो दोन पबमध्ये गेला होता. एका पबमध्ये त्याने 48 हजार रुपये उडवले. त्यात दारुच बिल सुद्धा होतं. ते बिल सुद्धा पोलिसांकडे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारु पार्टी करताना दिसला आहे. त्यामुळे त्याचा ब्लड रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. पोलिसांनी अजून त्याचा ब्लड रिपोर्ट काय आहे? त्याची माहिती दिलेली नाही. ब्लड रिपोर्टमधून आरोपीने त्यावेळी मद्य प्राशन केलेले की, नाही? ते समजू शकते. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे.
