विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना गद्दार म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असे फटकारत कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार हे महाराष्ट्रातील जनतेने २०२४ सालीच दाखवलं, असे उत्तर त्याला दिले आहे. (Freedom is not selfishness, CM reprimands Kunal Kamra for singing ‘Gaddar’)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने २०२४ साली दाखवलं आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही व्यंग करा, पण अपमानित करण्याचा काम कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. कामरांनी माफी मागितली पाहिजे, ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यांवर अतिक्रमण करता येणार नाही. कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
