मुख्यमंत्र्यांनी सादर केले शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड; महिला व बालकल्याण विभागाला डिस्टिंक्शन, अनेक विभाग नापास

विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात विविध विभागांनी केलेल्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. शासनाच्या ४८ विभागांनी केलेल्या कामाचा हा आढावा असून महिला आणि बालकल्याण विभागाने तब्बल ८० टक्के गुण मिळवत डिस्टिंक्शनसह अव्वल स्थान पटकावले आहे.

सामान्य प्रशासन (२४%), अन्न व नागरी पुरवठा (३३%) आणि नगरविकास विभाग (३४%) या विभागांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली असून ते ‘नापास’ झाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेला नगरविकास विभाग या यादीत पिछाडीवर राहिला, तर त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र दुसरे स्थान मिळवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवरून हे रिपोर्ट कार्ड सादर करताना म्हटले, “महायुती सरकारने स्थापनेनंतर शंभर दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा तयार केला होता. त्याअंतर्गत ९०२ धोरणात्मक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. त्यातील ७०६ उद्दिष्टांची (७८%) पूर्तता करण्यात आली असून उर्वरित १९६ उद्दिष्टांवर काम सुरू आहे.”

१२ विभागांनी १००% उद्दिष्ट पूर्तता केली असून आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी विभागानेही ६६.१५% गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे. ४८ पैकी १२ विभागांनी १००% उद्दिष्ट पूर्तता केली.

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांत बारा विभागांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. 12 विभागांनी ठरवलेल्या मुद्यांवर शंभर टक्के काम केले. जलसंपदा,गृह,ग्रामविका,पशुसंवर्धन,बंदरे विभागास 100 टक्के गुण मिळाले. उच्च व तंत्रशिक्षण,कामगार,वस्त्रोद्योग विभागालाही पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. सांस्कृतिक,खणीकर्म, दुग्धव्यवसाय,रोहयो विभाग अव्वल ठरले आहेत.