विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे – निसर्गसंपन्नतेपासून ते ऐतिहासिक वास्तूंपर्यंत, आधुनिक शहरांपासून ते पारंपरिक खेड्यांपर्यंत. हीच विविधता भारताला आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक परिपूर्ण ‘शूट इन इंडिया’चे केंद्र बनवू शकते, असा ठाम विश्वास अभिनेता शाहरुख खान यांनी व्यक्त केला. ( India can become Shoot in India for international filmmakers believes actor Shah Rukh Khan)
‘वेव्हज 2025’ या शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या विशेष सत्रात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी करण जोहर यांच्याशी संवाद साधला. भारतात केवळ चित्रीकरणासाठीच नव्हे, तर कथा, तंत्रज्ञान, कलाकार आणि प्रेक्षक अशा सर्व पातळ्यांवर अमर्याद संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाहरुख खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या शिखर परिषदेच्या कल्पनेमागे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल अभिनंदन केले आणि मनोरंजन उद्योगाच्या वतीने त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, वेव्हज हे व्यासपीठ भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’ला चालना देणारे ठरणार आहे आणि सरकार व खाजगी क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट करेल.
शाहरुख खान म्हणाला, भारतात ‘शूट इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत चित्रपटसृष्टीत परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची मोठी क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म बोर्ड व कंपन्यांसोबत करार करून भारताला ग्लोबल कंटेंट हब बनवता येईल. चित्रपट क्षेत्रात नवोदित कलाकारांनी ‘आउटसाइडर’ किंवा ‘इनसाइडर’ टॅगपेक्षा कौशल्य, कष्ट आणि चिकाटीवर भर द्यावा.
त्यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील चित्रपटगृहांना चालना देण्यासाठी ‘सिंगल स्क्रीन थिएटर’ला पुन्हा नवसंजीवनी देण्याची कल्पना मांडली. “भारतीय सिनेमा अधिक परवडणारा आणि सर्वदूर पोहोचणारा असायला हवा,” असं ते म्हणाले.
दीपिका पदुकोणने वेव्हज परिषदेमुळे विविध माध्यमे – चित्रपट, ॲनिमेशन, ओटीटी, AI (कृत्रिम प्रज्ञा) – यांना एकत्र आणण्याची संधी असल्याचे सांगितले. या एकत्रिकरणामुळे भारतीय मनोरंजन उद्योग नव्या शिखरांवर पोहोचू शकतो.
नव्या कलाकारांना सल्ला देताना दीपिका म्हणाली, केवळ सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यापेक्षा प्रत्यक्ष अभिनय कौशल्यावर भर द्यावा. “प्रतिमा व्यवस्थापन हे तात्पुरते असते, परंतु कौशल्य हे दीर्घकाळ टिकणारे असते. आजच्या काळात वेगळेपणच खरी ओळख बनवतो.
“भारत ही एक ‘सॉफ्ट पॉवर’ आहे आणि आता आपल्या कहाण्यांद्वारे जगाला भुरळ घालण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत करण जोहर यांनी या परिषदेला एक सांस्कृतिक क्रांतीची सुरूवात ठरवले.
