आयएसआयच्या निमंत्रणावर पाकिस्तान दौरा, परतल्यावर राफेलवर टीका, मुख्यमंत्री सरमा यांचा गौरव गोगोईंवर थेट हल्ला

विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : “गौरव गोगोई पाकिस्तानला गेले होते ते पर्यटनासाठी नव्हे, तर आयएसआयकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. परत आल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवर टीका केली,” असा थेट आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ( Visited Pakistan on the invitation of ISIcriticized Rafale on return Chief Minister Sarma directly attacked Gaurav Gogoi)

“जर माझं एकही वाक्य खोटं ठरलं, तर मी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा देईन,” असं आव्हानही सरमा यांनी दिलं.

मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “गौरव गोगोई पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाच्या थेट निमंत्रणावर गेले. आमच्याकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत. हे निमंत्रण सांस्कृतिक की राजनैतिक नव्हतं, तर थेट सुरक्षा संस्थेशी संबंधित होतं. ज्यांना गृह मंत्रालय बोलावते, त्यांचा हेतू पर्यटन नसतो.”

सरकारकडे या दौऱ्याचे दस्तऐवज असून, १० सप्टेंबरपर्यंत ते उघड करण्यात येतील, असेही सरमा यांनी स्पष्ट केले. “जनतेसमोर सर्व पुरावे ठेवले जातील. कोणीही गोंधळ उडवू नये. आम्ही दूतावासामार्फत अधिकृत कागदपत्रांची पुष्टी करणार आहोत,” अशी माहितीही त्यांनी दिली.

गौरव गोगोईंनी राफेल खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत सरमा म्हणाले, “ज्या वेळी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज होती, तेव्हा काही लोक परकीय दबावाखाली निर्णयांना विरोध करत होते. हे फक्त राजकीय मतभेद नव्हते, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुळावर घाव होता.”

मुख्यमंत्र्यांच्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण पेटले असून, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भाजपने गोगोईंच्या दौऱ्याला “राष्ट्रीय सुरक्षेला धोका” म्हणत काँग्रेसवर देशविरोधी मानसिकतेचा आरोप केला आहे.