हेरगिरीचे जाळे उध्वस्त,ज्योती युट्यूबर ते सुरक्षारक्षक असे अकरा अटकेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात राबवलेल्या सुरक्षा मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर अवघ्या तीन दिवसांत देशभरातून ११ हेरगिरी करणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली. ( Spy network busted eleven arrested from YouTuber Jyoti to security guard)

पाकिस्तानच्या आयएसआय ( ISI ) गुप्तचर यंत्रणेने सोशल मीडियाचा वापर करून युवकांना फसवत हेरगिरीसाठी तयार केले. हे जाळं केवळ सैन्य छावण्यांपुरते मर्यादित नसून, डिजिटल, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर रचलेली योजनाबद्ध घुसखोरी आहे. अटक केलेले सर्व आरोपी २० ते ३० वयोगटातील असून, यामध्ये युट्यूबर, विद्यार्थी, सुरक्षारक्षक, अ‍ॅप डेव्हलपर आणि व्यापारी यांचा समावेश आहे.

ज्योती मल्होत्रा
हरियाणाच्या हिसारमधील २४ वर्षीय ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनलला ३.८५ लाख सब्सक्राइबर्स होते. ती २०२३, २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानला गेली होती. तपासात समोर आले की, ती पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील एजंट एहसान उर रहीम उर्फ ‘दानिश’च्या संपर्कात होती. तिला हेरगिरीसाठी फंडिंग, व्हिसा आणि प्रसिद्धीचा वापर करून भारतीय सैन्यविषयक माहिती मिळवण्याचा कट रचला गेला.

गजाला व यामीन मोहम्मद (पंजाब): दानिशकडून पैसे आणि व्हिसा घेऊन बँक डिटेल्स आणि फंड ट्रान्सफरचे काम करत होते.
देवेंद्र सिंह (हरियाणा – कॅथल) याने पटियाला लष्करी छावणीचे फोटो ISI ला पाठवले. फेसबुकवर बंदुकीसह फोटो टाकून प्रभावित करण्याचा प्रयत्न.
अरमान (नूंह) याने व्हॉट्सॲपवरून लष्कराच्या हालचाली आणि फोटो पाकिस्तानला पाठवले. त्याच्या मोबाइलमध्ये गोपनीय व्हिडीओ आढळले.

नौमान इलाही (पानीपत)याने सुरक्षारक्षकाच्या नोकरीचा गैरफायदा घेऊन ISI ला माहिती पुरवली. अनेकदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला.

मोहम्मद मुर्तजा अली (जालंधर) tar याने हेरगिरीसाठी खास अ‍ॅप तयार केले होते. चार मोबाइल, तीन सिमकार्डसह त्याला अटक करण्यात आली.

शहजाद (रामपूर) हा बनावट व्यापाराद्वारे पाकिस्तानशी व्यवहार. मुरादाबादमधून अटक करण्यात आली.

सुखप्रीत सिंग व करणबीर सिंग (गुरुदासपूर) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील माहिती ISI ला पुरवली. त्यासाठी त्यांना १ लाख रुपये मोबदला मिळाला. ड्रग्स तस्करीतहीत्याचा सहभाग होता.

हे सर्व आरोपी एकाच नेटवर्कचा भाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया, हवाई प्रवास आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर करून हे जाळं उभारले गेले. केंद्र सरकार, गुप्तचर यंत्रणा, सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई झाली.

अटक केलेल्या ११ जणांचे मोबाइल, बँकिंग आणि ई-मेल तपासातून नवे धागेदोरे समोर येत आहेत. गृह मंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला असून, पाकिस्तान पुरस्कृत हेरगिरी नेटवर्कविरुद्ध आणखी मोठ्या कारवायांची शक्यता आहे.