विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानमंडळाच्या अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आणि कोकाटेंवर निशाणा साधला. मात्र कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, “मी रमी खेळत नव्हतो, ती युट्युबवर आलेली जाहिरात होती.” ( Video of playing rummy on mobile Kokate clarifies it was an advertisement not a game)
माध्यमांशी संवाद साधताना कोकाटे म्हणाले, “मी वरच्या सभागृहात होतो. हाऊस अडजर्न झाल्यानंतर खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल उघडला. युट्युब उघडल्यावर तिथे जंगली रमीसारख्या जाहिराती येतात. अशा जाहिराती स्किप करायला काही सेकंद लागतात. मीही ती स्किप करत होतो. पण विरोधकांनी केवळ १८ सेकंदांचा क्लिप दाखवून माझ्यावर आरोप केलेत. पूर्ण व्हिडिओ दाखवला असता, तर स्किप केल्याचेही दिसले असते.”
“मी काही गेम खेळत नव्हतो. जेव्हा मोबाईलवर युट्युब ओपन केलं, तेव्हा डाउनलोड झालेला गेम स्क्रीनवर आला. त्याला स्किप करत होतो. पण त्या काही सेकंदांतच कुणीतरी व्हिडिओ शूट केला आणि तो आता माझ्या बदनामीसाठी वापरला जात आहे,” असे कोकाटे म्हणाले. विधानभवनात सर्वत्र सीसीटीव्ही आणि कॅमेरे असतात, तिथे बसून मी मुद्दाम गेम खेळेन का? असा सवालही त्यांनी केला.
रोहित पवार यांच्यावर टीका करताना कोकाटे म्हणाले, “विरोधी पक्षनेते माझ्या धोरणांवर काहीही बोलत नाहीत. मात्र त्यांनी आजवर माझ्या कपड्यांवर, गाड्यांवर, मोबाईलवर आणि आता जाहिरातींवर टीका केली आहे. मी शेतकऱ्यांसाठी राज्यभर फिरतो, बैठका घेतो, धोरणं तयार करतो, ते कुठेच दिसत नाही का?””
कोकाटेंनी रोहित पवारांना थेट सवाल करत म्हटलं आहे की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी एक तरी मुद्दा उपस्थित केला आहे का? मी जे काम करतो त्यावर भाष्य का करत नाहीत? केवळ माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे केलं जात आहे. हे सगळं जनतेलाही समजतं. अशा कुरघोड्यांनी काहीही साध्य होणार नाही.”
कोकाटेंनी म्हणाले, “आजच्या सोशल मीडियाच्या युगात जंगली रमी, गाण्यांच्या किंवा अन्य अॅप्सच्या जाहिराती युट्युबवर दिसतातच. माझ्या मोबाईलवर आल्या म्हणून त्याचा अर्थ मी गेम खेळतो असा होतो का? रोहित पवारांच्या मोबाईलवर अशा जाहिराती येत नाहीत का? मग त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं.”
