मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन भाजपला केले होते, मात्र ही संस्कृती आपले पुतणे अजित पवार यांना शिकविली नाही का असा सवाल केला जात आहे. कारण कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची दुहाई दिली होती. पण आता स्वतः मात्र पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीत उतरण्याची तयारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे पवार म्हणाले होते. त्यानंतर भाजपने आपला उमेदवारही मागे घेतला होता. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा आमदार होता, मात्र या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इच्छूक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
भाजपकडून चिंचवड येथे शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव कळवले आहे. कसबा विधानसभेसाठी दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेणार आहे. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का? याबाबत मला शंका आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांनी भाजपला जी राजकीय संस्कृती सांगितली ती अजित पवार यांना सांगितली नाही का असा सवाल केला जात आहे.
