मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, खराब हवामानामुळे विमान माघारी परतले. आता शिंदे-फडणवीस यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागणार होता. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता वर्षा निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा आज समारोप आहे. गेल्या पाच दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.. या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित झाले आहेत. आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार होते.
दरम्यान, आज संध्याकाळी शिंदे गटाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी 5 वाजता खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शिंदे या बैठकीसाठी आजचा जळगाव दौरा रद्द करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
