मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता असे उघड झाले आहे. अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणारी अनिक्षा जयसिंघानीया हिचे वडील अनिल जयसिंघानीया यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे या संपूर्ण ब्लॅकमेल प्रकरणात समझने वाले को इशारा काफी है अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणात नवा ट्विटस्ट येण्याची चिन्हे आहेत. अनिल जयसिंघानीया यांनी 2014 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित केलेल्या पक्षप्रवेशाचे फोटो आता समोर आले आहेत. मुळात क्रिकेटचा बुकी असलेला, पाच राज्यात वॉन्टेड गुन्हेगाराला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिलाच कसा? याच शिवसेनेने निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे याला एकेकाळी शिवसेनेत प्रवेश दिला होता. त्यानंतर त्याचा राजकीय उपयोगही करून घेतला.
राज्यात ठाकरे सरकार आल्यावर त्याला पुन्हा पोलीस दलात पद बहाल करण्यात आले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन खून प्रकरणाला वाचा फोडली. त्यावेळी वाजेची पाठराखण उद्धव ठाकरे यांनीच केली होती. मात्र पुढचा सगळा घटनाक्रम सगळ्यांनाच माहिती आहे. ठाकरे सरकारला वाजे प्रकरणात तोंडावर पडावे लागले.
आता अनिल जयसिंघानीया प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.हा एक राजकीय कट आहे का ते मी पुरावे सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही. मी एक जबाबदार राजकीय नेता आहे. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मात्र सगळ्या घटनाक्रम पाहिल्यावर यामध्ये राजकारण आहे हे न ओळखण्याइतकी जनता दूधखुळी नाही.
