बाबरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

बाबरी पाडली तेव्हा कुठे होता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना केला आहे. भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. पाटलांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिंदे म्हणाले की, त्यांना (उद्धव ठाकरे आणि संजय राऊत) बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी त्यांचा नैतिक अधिकार गमावला आहे. तसेच बाबरी मशिद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.