मोठ्या पडद्यावर दिसणार महात्मा फुलेंची जीवनगाथा; मुनगंटीवार यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण

समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ, लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

मुनगंटीवार याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “सत्यशोधक या चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरण करताना मला अतिशय आनंद होतो आहे. २१व्या शतकात समाजातील आपण सर्वजण एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहोत व अशा काळात सत्यशोधक हा चित्रपट समाजाला दिशा देणारा असेल. क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांचा “सब समाज को साथ लिए हम, हम को है आगे बढना” हा विचार आणि त्यांच्याबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा येथे महिलांसाठी सुरु केलेली शाळा हा प्रवास दाखविणाऱ्या सत्यशोधक या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा प्राप्त होईल. चित्रपट निर्मितीतून समाज परिवर्तनाची मशाल पेटवायची हे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून करणाऱ्या निर्मात्यांचे व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”

या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य दाखविले आहे, तसेच या कलाकृतीतून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेला संघर्ष मांडला आहे. बहुआयामी कलाकार संदीप कुलकर्णी “सत्यशोधक” मध्ये महात्मा फुले यांची भूमिका साकारणार असून राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, अनिकेत केळकर, अनिरुद्ध बनकर, राहुल तायडे, मोनिका, जयश्री गायकवाड, डॉ. खेडेकर, डॉ. सुनील गजरे या कलाकारांची साथ त्यांना लाभणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये समाजाची तेव्हाची स्थिती दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये म्हटलं जातं, ‘अनंत काळाच्या गर्भातून आलेली ती गुलामी होती, धर्माच्या मुजोरीतून एकाने लादलेली आणि दुसऱ्याने स्वीकारलेली. ती एक संवेदनहीन व्यवस्था होती. तिला स्त्री म्हणून तुडवणारी आणि त्याला शूद्र म्हणून हिणवणारी तर कधी इथल्याच भूमिपुत्राला मातीत गाडणारी. कधीही न संपणारी रात्र होती मग एक सूर्य क्रांतीचा अंधाराला चिरत आला तो वंश वेळीचा नवा युगाचे वध घेऊन आला, मानवतेचा बोध देऊन गेला. असत्यावर मात करुनी एक सत्यशोधक आला.’ हा टीझर शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘संवेदनहीन अज्ञानाच्या रात्रीला संपवायला उगवला आहे एक अथांग ज्ञानाचा क्रांतिसूर्य.. ‘सत्यशोधक’ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सादर करीत आहोत ‘सत्यशोधक’ सिनेमाचे टिझर पोस्टर.हा चित्रपट 2023 मध्ये लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.