भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराम रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन. अस्पृश्यता पाळली जात असताना, सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. खर्या अर्थाने बाबासाहेबांचे जीवन आत्मसात करण्याचा हा दिवस. बाबासाहेबांचे जीवन एका संघर्षाची अशी कहाणी होती, जिने समाजातील प्रत्येक घटकासाठी काही आदर्श व मूल्ये निर्माण केली. बाबासाहेबांच्या आयुष्यात समाजाप्रति समर्पण व समाजनिर्माणाच्या एका अद्भुत संकल्पाची शपथ दृष्टिपथास येते. ज्या संघर्षमय वातावरणात बाबासाहेब आयुष्य जगले, कदाचित याहून अधिक संघर्ष अजून कोणाच्या वाट्याला आला नसावा.
डॉ. आंबेडकर फक्त एक वकील नव्हते, तर ते एक महान लेखक, अर्थशास्त्री, कायदेतज्ज्ञ, समाजसेवी आणि एक दूरदर्शी नेतासुद्धा होते. भारतीय समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय प्रक्रियेबद्दल बाबासाहेबांचे विचार अतुलनीय होते. या अनन्यसाधारण गुणवत्तेच्या जोरावर बाबासाहेब स्वतंत्र भारतात प्रथमच विधी आणि सामाजिक न्यायमंत्री झाले. ते भारतीय संविधानाचे जनक तसेच भारताच्या प्रजासत्ताक निर्मात्यांपैकी एक होते. भारतीय संविधाननिर्मितीच्या योगदानामुळेच त्यांना ‘भारतीय संविधानाचे पितामह’ म्हणूनही संबोधले जाते. देशाला दिशा देणारे बाबासाहेब समता, स्वतंत्रता आणि समरसतेच्या सौंदर्याचे प्रतीक पुरुष होते. संविधानाविषयी ते म्हणायचे की, “संविधान हे वकिलांसाठी फक्त पुस्तक नसून ते खर्या अर्थाने जीवन जगण्याचे एक माध्यम आहे.”
बाबासाहेबांचा प्रवास…
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्याला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी विविध पद्धतीने सहकार्य आणि मदत केली.
बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई विद्यार्थी होते.
डॉ.बाबासाहेबांच्या लेखनात, वाचनात व चिंतनात प्रचंड ताकद, शक्ती होती. ज्ञानसंपादनाच्या शक्तीमुळेच व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनते याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी आपल्या लिखाणातून व कार्यातून तळागाळातील माणूस जागा केला. त्यांना आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता याची जाणीव करुन दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी १९२० साली पहिले मराठी पाक्षिक ‘मूकनायक’ सुरु केले.
बाबासाहेबांनी १९४७ साली कायदा मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव संसदेत मांडला. हे विधेयक क्रांतिकारी होते. हिंदू वैयक्तिक कायद्यात एकाच वेळी परस्परपूरक पुरोगामी तत्वे समाविष्ट करण्याचे हे क्रांतिकारक पाऊल होते. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नासंबंधातील स्त्री पुरुष समानता, नवऱ्याने केलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात दाद मागण्याचा अधिकार, महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, वारसा हक्काचा लाभ महिलांनाही देण्याची तरतूद इत्यादी तत्वे या बिलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट केली होती. डॉ. बाबासाहेबांच्या मते सामाजिक न्यायचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाचा वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने या विधेयकाला संसदेत प्रचंड विरोध झाला.
सुरुवातीला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंचा या विधेयकाला पाठींबा होता. पण काँग्रेसमधील सनातनी विचाराच्या नेत्यांनी या विधेयकाला प्रखर विरोध दर्शवल्यानंतर पंडित नेहरुंनी हे विधेयक मागे घ्यावे, अशी विनंती बाबासाहेबांना केली. देशाची राज्यघटना बनवताना बाबासाहेबांनी जितकी मेहनत घेतली होती, तितकीच मेहनत हे विधेयक बनवताना बाबासाहेबांनी घेतली होती. त्यामुळे बाबासाहेबांना खूप वाईट वाटले. हिंदू कोड बिलाला होणारा विरोध बाबासाहेबांसाठी खूप त्रासदायक ठरला. शेवटी या मुद्द्यावरुन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोणतीही चळवळ महिलांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, सामाजिक क्रांती करायची असेल तर त्यात महिलांचा समावेश असावाच असे, बाबासाहेबांचे मत होते. म्हणूनच त्यांच्या सर्व आंदोलनात महिलांचा समावेश होता. मग ते १९२७ चे चवदार तळ्याचे आंदोलन असो की १९३० च्या नाशिकमधील काळाराम मंदिरातील आंदोलन असो.
डॉ.बाबासाहेबांनी तमाम वंचित आणि शोषितांसाठी कार्य केले. खास करुन शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या समस्यांची विशेष चिकित्सा करुन त्यावर उपाय सुचवले. शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण करणारी खोती पद्धत कोकणात अस्तित्वात होती. खोती पद्धतीचे प्राबल्य नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. ठराविक कालावधीच्या अंतराने येणारा दुष्काळ हे शेतकऱ्याचे मोठे दु:ख आहे. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांनी विविध योजना सुचवल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘पीक विमा योजना’. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी याकरिता नद्या जोड प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प आदी महत्त्वाच्या योजना होत्या. शेतीसाठी मुबलक व स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबतही डॉ.बाबासाहेब आग्रही होते. त्यांनी राज्यघटनेच्या कलमानुसार शेतकऱ्यांसाठी खास लवाद निर्माण करण्याची तरतूद निर्माण केली.
डॉ. आंबेडकरांनी अनेक मूलभूत संकल्पना मांडल्या. त्यामागची गहन संशोधनाअंती आलेली कारणमीमांसा मांडली. त्यांनी मांडलेल्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या. आजही अमलात आणल्या जात आहेत. काही संकल्पना, मांडणी कालबाह्यदेखील झाली. त्याचे कारण ती मांडणी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केलेली होती. पण, तत्व कायम राहिली आहेत. एका बाजूला अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण कल्पना त्यांनी मांडल्या, तर दुसर्या बाजूला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र अधिक जोमाने पुढे नेला. दलितांच्या आर्थिक उन्नतीसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. हा विचार आधुनिक काळात ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’द्वारे अधिक जोमाने पुढे गेला. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे दलित आणि जनजातीय घटकांना आर्थिक सुबत्तेची, स्वतंत्रतेची संधी मिळाली. सहकारी शेतीची संकल्पना देशाच्या अनेक भागात आकाराला आली आहे.
त्याचे स्वरूप विस्तारत आहे. केंद्र सरकारने सहकारी शेतीच्या वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी केल्या आहेत. सातत्याने वाढवत नेल्या आहेत. जितके जास्त डॉ. आंबेडकर यांचे मूळ कार्य, मांडणी वाचत, अभ्यासत जातो तितके अधिक अचंबित व्हायला होते. प्रचंड परिश्रमातून, खडतर परिस्थितीचा सामना करुन त्यांनी महानता गाठली आहे. त्यांच्या महान कार्याचा अभ्यास करावा, आकलन करण्याचा प्रयत्न करावा आणि कायम नतमस्तक असावे, हेच श्रेयस्कर!
