केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांनी देखील 13 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खोकला आणि सर्दीची त्रास झाल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली.
सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 57 हजारच्या पुढे आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळं 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण केरळमध्ये आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे.
