मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमेय घोले यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी सोमवारी (१७ एप्रिल) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोले समजले जातात.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अमेय घोले आणि त्याच्या वार्डातील व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं मी शिवसेनेत मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं म्हणजे अमेय घोले म्हणाला होता की, आपण मोठा पक्षप्रवेश करू. परंतू खारघरमध्ये आपला मोठा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर दुर्दैवाने दुर्घटना झाली. खरं म्हणजे ते आपल्या परिवारातील सदस्य आहेत. त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. म्हणूनच अतिशय साधेपणाने अमेय घोले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो.”

“आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आमदार, खासदार, शिवसेनेचे नेते, उपनेते व अगदी संघटनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असे हजारो-लाखो कार्यकर्ते राज्यभरातून आपल्या शिवसेनेत दाखल होत आहेत. याचं कारण गेल्या सात-आठ महिन्यात आपल्या सरकारने लोकांसाठी काम केलं आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “सरकारने मागील सात-आठ महिन्यात घेतलेले निर्णय बघितले, तर ते लोकांच्या हिताचे आणि सर्वसमावेशक निर्णय आहेत. यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी, महिला या सर्वांसाठी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मागील अडीच वर्षात जे प्रकल्प बंद पडले होते त्याला आपण चालना दिली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विश्वास निर्माण झाला आहे की, आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, तर सरकारच्या माध्यमातून आपण तो न्याय देऊ शकतो.”