नगरमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकले म्हणून पुण्यात मोर्चा का? असे विचारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने सवाल केले आहेत.
मतांच्या राजकारणासाठी किंवा विशिष्ट लोकांचे लांगुलचालन करण्यासाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत व्हिडिओमध्ये भाजपने म्हटले आहे की जर नगरमधील घटनांचे पडसाद पुण्यात का? असा सवाल करता तर तुमचे एक नेते गाझा पट्टीत घडणाऱ्या घटनांचा येथे निषेध का करतात? औरंगजेब चांगला राजा आहे असे म्हणणारा अबू आजमी तुमच्या महाविकास आघाडीत का? औरंगजेबासारख्या धर्मांध राजाचे फोटो घेऊन तरुण नाचतात. पंधरा सोळा वर्षांची मुले त्याच्या फोटोचे स्टेटस ठेवतात. याचा परिणाम देशाच्या भावी पिढीवर काय होईल याचा अंदाज तुमच्यासारख्या महाराष्ट्रात 40-50 वर्ष राहिलेल्या नेत्याला येऊ नये हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
