महाराष्ट्राचा नवीन सूर्य कधी उगवणार ?

महाराष्ट्राच्या जनतेचं मनोगत :

नमस्कार मंडळी,

मी ? मी या महाराष्ट्राची जनता !!! राज्याचा कारभार बघून हताश, निराश आणि थकलेली जनता मात्र कधी ही हार न मानणारी जनता, म्हणजे मी. मित्रहो, १९६० पासून मी या महाराष्ट्राला बघत आले आहे. या महाराष्ट्राने अनेक उन्हाळे, पावसाळे बघितले, अनेक आपदा बघितल्या, पानशेत धरणफुटी पूर बघितला, १९९३च्या दंगली बघितल्या, सीरिअल बॉम्बब्लास्ट, दहशतवादी हल्ले, २६ जुलैचा पाऊस काय नाही बघितलं ते सांगा ? मात्र आज… आज जी दशा महाराष्ट्राची झाली आहे, ती गेल्या कित्येक दशकात झालेली नव्हती, हे मात्र खरं. आज पर्यंत इतक्या संकटांवर मात करत मी कधीही हरले नाही. योग्य ती निवड करून सरकार स्थापन करण्याचा अधिकार माझ्या हातात होता, तेव्हा मी आज पर्यंत योग्य वाटेल तो निर्णयच घेतला, अगदी या वेळी सुद्धा, मात्र देवाला ते काही मंजुर नव्हतं, आणि म्हणूनच बघा बरं आज या महाराष्ट्राचं काय झालं.

असं म्हणतात, एखादं घर तोपर्यंत प्रत्येक संकटाला हसत खेळत सामोरं जाऊ शकतं, जो पर्यंत घरातील मोठी व्यक्ति, कुटुंब प्रमुख व्यक्ति त्या घराची काळजी निगुतीने घेते, खंबीरपणे घरच्यांच्या पाठीशी उभी राहते. आज महाराष्ट्रात माझा वाली कोण बरं ? गेल्या ५ वर्षांमध्ये मी महाराष्ट्रात सुवर्णकाळ बघितला. महाराष्ट्राचा विकास, आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राची घोडदौड, महाराष्ट्राला मिळालेला सुसंस्कृत प्रमुख नेता, संकटांना बुद्धी, चातुर्य, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या आधारे तोंड देणारा, त्या संकटांमधून महाराष्ट्राला सोडवणारा नेता. आणि मग नियतीचं चक्रच फिरलं, निवणडूका झाल्या खऱ्या मात्र त्याला काहीच अर्थ राहीला नाही, पहिल्यांदा माझ्या मताच्या अधिकाराला धुडकवण्यात आलं होतं, पहिल्यांदा माझ्या या सगळ्यात मोठ्या शक्तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, आणि इथूनच महाराष्ट्राच्या विकासाची उतरती पायरी सुरु झाली !!!

सत्ता परिवर्तन झालं, सगळं चित्रंच बदललं, घोडदौड करणाऱ्या विकास कामांची लगाम खेचण्यात आली आणि क्षणार्धात ही विकासकामे थांबविण्यात आली, अनेक योजना बंद पडल्या, कारण केवळ एकच, त्या निर्माण करणाऱ्या व्यक्ति प्रति, त्याच्या जातिप्रति, त्याच्या लोकप्रियतेप्रति द्वेष भावना. आणि मग.. काही दिवस गेले आणि लगेच हा ‘कोविड व्हायरस’ आला. आणि जेव्हा आम्हाला एका कुटुंब प्रमुखाची खरी गरज होती, तेव्हा अगदी तेव्हाच आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटू लागलं. कारण ? ते तर तुम्हाला माहीतच आहे.

आज महाराष्ट्रात अनलॉक झालं आहे, कामे सुरु झाली आहेत, मात्र कोविड काही जायचं नाव घेत नाहीये, तसं ते आपल्या हातातही नाही म्हणा, मात्र शासनाच्या हातात आपल्या जनतेची काळजी घेणं तर नक्कीच आहे, जनतेसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी काम करणं गरजेचं आहे, महाराष्ट्राच्या किती तरी लाख कुटुंबांना ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ सांगण्यापेक्षा महाराष्ट्राला कुटुंब मानून त्याची जबाबदारी, माझी जबाबदारी घेणं आवश्यक आहे, मात्र मी म्हणाले तसं, माझा इथे कुणीही वाली नाही.

गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र विकासकामांमध्ये, रोजगारामध्ये, आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये नंबर १ वर होता, आणि आज ? आज महाराष्ट्र कोविड पेशंट्सच्या संख्येत, कोविडमुळे मृत झालेल्या लोकांच्या संख्येत, ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या प्रशासनाला एका नटीचं घर पाडणं, कितीतरी घरांचे रक्षण करण्यापेक्षा अधिक महत्वाचं वाटतं, इथल्या प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यापेक्षा एका मीडिया चॅनल ने सरकार विरोधात प्रश्न विचारले तर त्यांना धडा शिवकणं महत्वाचं वाटतंय, इथल्या प्रशासनाला माझ्या (महाराष्ट्राच्या जनतेच्या) रक्षणापेक्षा आपल्या खुर्चीचं रक्षण अधिक महत्वाचं वाटतं, आणि हीच खरी शोकांतिका आहे.

आज मी पोरकी झाली आहे, माझ्यासाठी पुढे येऊन काम करणारं प्रशासन इथे नाही, मात्र हेच प्रशासन पुढच्यावेळी मतं मागायला नक्की येईल, याची खात्री आहे मला. मात्र माझी आठवण यांना तेव्हाच का यावी? आज जेव्हा मला गरज आहे एका खंबीर नेतृत्वाची, तेव्हा का हे माझ्यासाठी मैदानात उतरत नाही ? कदाचित हाच प्रश्न पुढच्यावेळी उत्तर बनून मतांमधून दिसेलही. मात्र तोवर महाराष्ट्राच्या नवीन सूर्योदयाच्या प्रतीक्षेत मी वाट बघतेय !!! सुवर्णकाळ दाखवणाऱ्या सूर्या.. आतातरी प्रकट हो !!!

  • महाराष्ट्राची जनता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *