
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातून अनेक गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे. यावर फडणवीसांनी ‘मी कधीही सुरक्षा मागितलेली नव्हती मात्र राज्य सरकार यावरुन राजकारण करत आहे. सुरक्षा कमी झाल्यामुळे माझं फिरणं थांबणार नाही. माझ्या फिरण्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही.” असे म्हटले आहे. फडवीसांसारखे नेते जे राज्यभर फिरून जनतेच्या कल्याणासाठी कामं करताएत, त्यांच्या सुरक्षेत अचानक इतकी मोठी कपात योग्य आहे का ? याचे काय कारण असेल ? असे प्रश्न आता सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाले आहेत.
फडणवीसांनी सांगितले, “मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील सुरक्षा घेतली नव्हती. मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर मला सुरक्षा देण्यात आली, मला काही थ्रेट्स (धमक्या) आल्याने देखील ही सुरक्षा कायम करण्यात आली होती. सरकार ला असे वाटत असेल कि धोका आता कमी झाला आहे म्हणून आता ही सुरक्षा कमी करण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक राजकीय निर्णय घेतला आहे, मात्र त्याची एक पद्धत असते. या बद्दल माझी काहीही तक्रार नाही.” “याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्शलवादी कारवायांनंतर सेंट्रल कडून काही इनपुट्स मिळाले होते त्यानुसार मला सुरक्षा देण्यात आली होती. मला सुरक्षा काढण्याविषयी अडचण नाही, मला कशाची भिती देखील वाटत नाही. मी बिना सुरक्षा देखील फिरू शकतो. मात्र सुरक्षा कपात करायची कि नाही हे ‘थ्रेट पर्सेप्शन’ वर ठरत असतं, त्याची एक पद्धत असते, आमच्या काळात तरी आम्ही तीच पद्धत वापरायचो.” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे कान टोचले.
यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता नाही, तुम्ही जनतेच्या सुरक्षेची काळजी केली तरी आम्हाला पुरे आहे. पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे कि फडणवीसांना सुरक्षेची आवश्यकता आहे. असे निर्णय अहवालाच्या आधारे घेतले जातात, मात्र इथे राजकीय निर्णय घेतले जात आहेत.” असे म्हणत दरेकर यांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
एकूण महाराष्ट्राची परिस्थिती बघता सध्या “अंधेर नगरी चौपट राजा’ असे चित्र दिसून येते. संपूर्ण कोविड काळात महाराष्ट्राच्या जनतेची प्रत्यंक्ष संवाद विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला. ते प्रत्यक्ष सगळीकडे जाऊन लोकांना भेटले. महाराष्ट्र अतिवृष्टि, ओला दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कोविड अशा अनेक समस्यांना तोंड देत असताना, ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करत लोकांशी संवाद साधत होते, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस स्वत: जनतेजवळ जाऊन काम करत होते. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्या सुरक्षेत कपात करणं, जनतेला तरी पटलेलं नाही.
हा निर्णय कुठल्या हेतूनं घेण्यात आला? यामागे काय विचार होता ? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. मात्र धोका असताना देखील फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करणं हे मात्र सामान्य जनतेला पटलेलं नाही, हे ही तितकंच खरं.
