
नसरापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!
पुण्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, सरकारवर कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा गंभीर गुन्ह्यांतील अनेक आरोपी हे पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षेसाठी कठोर कायदेशीर उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना अशा गुन्हेगारांना पॅरोल नाकारण्यासंदर्भात कायदा करण्यात आला होता. मात्र, काही वर्षांनंतर तो न्यायालयाने रद्द केला. आता पुन्हा त्याच धर्तीवर कठोर कायदा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.
