
मान्सूनने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई भागात पावसाची सुरुवात झाली असून येत्या काही वेळात संपूर्ण महाराष्ट्र भर धो धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोकण किनारपट्टी आदि भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. एकूणच पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी सांभाळून रहावे असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.
पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच चांगला पाऊस बघायला मिळत आहे. आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यासाठी वर्तवली होती. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील 24 तासात कुलाब्यात 102 मिमी, सांताक्रुजमध्ये 31.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी 8.30 पासून सांताक्रुजमध्ये आतापर्यंत 16.1 मिमी पावसाची नोंद, तर कुलाब्यात 13.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर देखील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. सोबतच मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्ध्यांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे.
नागरिकांनी या परिस्थितीत कालजी घ्यावी, आणि सांभाळून रहावे, तसेच अतिशय महत्वाचे कारण असल्याशिवाय घरातून बाहेर न पडावे अशी सूचना शासनातर्फे देण्यात आली आहे. पाऊस हा शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे, मात्र आपला जीव धोक्यात घालू नये अशी विनंती आमच्यातर्फे महाराष्ट्राच्या नागरिकांना आहे.
