
बदलापूर येथे गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण पूर्णपणे बंद आहेत. शासकीय रुग्णालयांमधून माहिती मिळाली आहे कि लसी उपलब्ध नाहीयेत. असे असताना शासनाने काढलेल्या निर्णयाप्रमाणे ज्यांचे पूर्ण लसीकरण आहे, केवळ त्यांनाच लोकलचा पास मिळणार आणि तेच लेकलने प्रवास करू शकणार, असे जाहीर केल्यामुळे बदलापूर करांची आता मोठी पंचाईत झाली आहे. महाराष्ट्रात एकूणच सुव्यवस्थेची पंचाईत झालेली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मात्र बदलापूर येथे अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होत आहे, त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण बंद का असा प्रश्न विचारत बदलापूरकर चांगलेच संतापलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या शासकीय रुग्णालयासमोर बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर लिहीलेले आहे कि लस नसल्यामुळे शासकीय रुग्णालयात लसीकरण शक्य नाही, त्यामुळे बदलापूर येथे नागरिकांना कामाच्या ठिकाणी लोकलने प्रवास करता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे.
बदलापूर मध्ये मोठ्या प्रमाणात असा चाकरमानी वर्ग आहे, जो आपल्या रोजीरोटीसाठी मुंबई बदलापूर असे अपडाउन करतो. लोकल सुरु होणार यामुळे बदलापूर करांना दिलासा मिळाला होता, मात्र शासनाच्या या हलगर्जीपणामुळे बदलापूरकरांना आणखी किती काळ वाट बघावी लागणार याची काही शाश्वती नाही, त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत, आणि एकूणच ऑफिस आणि रोजीरोटीचे हाल झाले आहेत. त्यामुळे बदलापूरकरांचा संताप झाला आहे.
नागरिकांचे म्हणणे आबे, कि बदलापूर येथे मोफत असलेली लस देण्यात येत नाहीये, आणि 780आणि 500 रुपयाला उपलब्ध असलेली लस मिळते आहे, हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न बदलापूरकरांनी उपस्थित केला आहे, एकूणच पुढे काय होतं, आणि बदलापूरकरांना दिलासा मिळतो का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
