काय आहे हा ओमिक्रॉन व्हेरियंट, का वाटतेय सगळ्यांना भिती ?


देशात कोरोनाची परिस्थिती आता बरी आहे, असे म्हणता म्हणता कोरोनाचा एक नवा व्हेरियंट पुन्हा एकदा समोर आला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट असे याचे नाव आहे. या आधी कोरोना नंतर ब्लॅक फंगस, येलो फंगस, व्हाइट फंगसने वैताग आणला होता, त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर देशाला हादरवून सोडले, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटमुळे जनता सतर्क झाली आहे.

काय आहे हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन ? :

दक्षिण आफ्रीकेत कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट सापडला, त्यानंतर जगाचे लक्ष्य पुन्हा एकदा कोव्हिडकडे वळले, तो पर्यंत नागरिकांचे जनजीवन सामान्य झाले होते, मात्र आता कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट आल्यामुळे सगळेच घाबरले आहेत. या व्हेरियंटचे म्यूटेशन्स अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. WHO ने या व्हेरियंटची नोंद “चिंताजनक” या श्रेणी मध्ये केली आहे. यामळे भविष्यात भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.



त्यातून नुकताच ओमिक्रॉन व्हेरियंट कर्नाटक येथे सापडला. दोन कोरोना बाधित रुग्णांमध्ये हा व्हेरियंट सापडला असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून मिळाली आहे. यापैकी एक व्यक्ति (वय ६६) दक्षिण आफ्रिकेची यात्रा करून नुकतीच भारतात आली होती आणि त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर आणखी एक व्यक्ति ज्यांच्याच हा व्हेरियंट सापडला आहे, त्यांनी कोरोनाच्या लसीचा एक डोस घेतला आहे. अद्याप दोघांची प्रकृति स्थिर आहे, असे सांगण्यात येत आहे.

या नवीन व्हेरियंट बद्दल अद्याप कुणालाच काहीच सांगता येत नाहिये, त्यामुळे पुढे काय करावं हे देखील स्पष्ट होत नाहीये, मात्र आरोग्य खात्याने संपूर्ण तयारीत असण्यासाठी आपली कंबर कसली आहे, असे दिसून येत आहे. एकूणच भविष्यात २०२२ या वर्षात कोरोनाची स्थिती भारतात कशी असेल, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.