दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजुट होण्याची आवश्यकता आहे. भारत आणि इंटरपोल यांच्यासाठी हा सध्याचा काळ खूप महत्वाचा आहे. दहशतवादाचे संकट अद्यापही आपल्या समोर आ वासून उभे आहे, आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण जगाने आता एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

इंटरपोलची ९० वी महासभा भारतात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महासभेत संबोधित केले. ते म्हणाले, भारत सध्या मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. हा आपल्या संस्कृतीचा, लोकांचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे. त्याचवेळी जगाच्या दृष्टीनेही सध्याचा कालखंड अतिशय महत्वाचा आहे. सध्या जगापुढे दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी अशी अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी जगाला सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. सुरक्षित जग हे प्रत्येक देशाचे प्राधान्य असायला हवे. त्यामुळे या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
विविधता आणि लोकशाही यशस्वी करण्यासाठी भारत हे जगासाठी उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सैन्य पाठवण्यात भारत हा सर्वोच्च योगदान देणारा देश आहे. भारतीय पोलीस दल ९०० हून अधिक राष्ट्रीय आणि १० हजार राज्यांच्या कायद्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करते. त्यामुळे जागतिक शांततेच्या इंटरपोलच्या धोरणामध्येही भारत मोठे योगदान देत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, इंटरपोलच्या सर्वसाधारण सभेला १९५ इंटरपोल सदस्य देशांचे शिष्टमंडळ सहभागी झाले आहे. यामध्ये मंत्री, देशांचे पोलीस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. इंटरपोलच्या आमसभेच्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन शिष्टमंडळेही आली आहेत.
दाऊदच्या हस्तांतरणाचा प्रश्न पाकिस्तानी अधिकाऱ्याने टाळला
इंटरपोलच्या महासभेमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट भारतात आले आहे. त्यांना सध्या पाकिस्तानात असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यास भारताकडे सोपविण्याची प्रक्रिया पाक सुरू करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.
