नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काॅंग्रेसवर जाेरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी 1980 साली काॅंग्रेसने शरद पवार यांचे सरकार पाडल्याची आठवण करून दिली. पंतप्रधान माेदी म्हणाले, या सभागृहात मागे एक ज्येष्ठ सदस्य बसले आहेत. त्यांना मी नेहमीच आदरणीय नेता मानताे. 1980 मध्ये शरद पवार यांचे वय 35 ते 40 हाेते. एक तरुण मुख्यमंत्री जनतेची सेवा करत हाेता. त्यांचे सरकारही काॅंग्रेसने पाडले हाेते.
आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात 1978 साली सरकार स्थापन झालं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. 1978 शरद पवार त्यांच्या 40 समर्थकआमदारांना घेऊन मुख्यमंत्री झाले हाेते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच पुराेगामी लाेकशाही आघाडीचा (पुलाेद) प्रयाेग केला. मात्र, दाेन वर्षांनंतर देशात पुन्हा काॅंग्रेसचे सरकार येऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचे पुलोदचं सरकार बरखास्त केले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली.
