शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तीवाद सुरू आहे. बंड झाल्यावर महाराष्ट्रातील जनतेला आणि आमदारांना भावनिक आवाहन करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाच त्यांच्या अंगाशी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे युक्तीवाद करत आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांनी पाठींबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटलं की त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असा युक्तीवाद त्यांनी केला आहे. पक्षांतरविरोधी कायदा हे विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी शस्त्र नाही. या सगळ्यात राजकीय नैतिकता महत्त्वाची आहे. ठाकरेंनी आधी राजीनामा दिला. नंतर पक्षांतरविरोधी कायदा शस्त्र उपसले गेले असेही ॲड साळवे यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे यांचा गट अल्पसंख्याक आहे. त्यांच्याकडे आमदार कमी आहेत मग ते गटनेता कसा काय नेमू शकतात असा सवाल शिंदे गटाचे वकील ॲड. नीरज कौल यांनी केला.
एकनाश शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी बंड केल्यावर 29 जून राेजी ठाकरेंनी राजीनामा दिला हाेता. त्यापूर्वी दहा दिवस त्यांनी सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यामुळे दहा दिवसांनंतर बहुमत गमावले आहे, याची त्यांना खात्री झाली. त्यामुळेच त्यांनी राजनीमा दिला असे म्हटले जात आहे.उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या निर्णयाची घाेषणा केली हाेती. रात्री साडेनऊ वाजता त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यावेळी चर्चा हाेती की जनतेमध्ये सहानुभूती निर्माण करून बंड केलेल्या आमदारांवर दबाव यावा यासाठी त्यांनी राजीनामा देण्याची खेळी केली. मात्र, ही खेळीच त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.काल पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामतांनी बाजू मांडली. आज शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज कौल, मनिंदर सिंग बाजू मांडत आहेत.
