मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधील मी संवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. विधवा महिलांना गंगा भागीरथी (गं.भा) म्हणण्याचा निर्णय वेदनादायी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.
चाकणकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार.
आयोगाच्या या शिफारसीचा संवेदशीलतेने विचार करत महिलांना सन्मान मिळवून देणारा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल शेकडो महिलांनी हात उंचावत याला पाठिंबा दिला होता.मंत्री महोदयांचे अभिनंदन…पुरोगामी महाराष्ट्राचा हा निर्णय महिलांचे सबलीकरण,सक्षमीकरण यात मोलाचा ठरेल अशी आशा आहे.
दुसरीकडे विधवा महिलांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे. महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून आपण निर्णय घेतला पाहिजे.
