महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली, दंगेखोरांना अद्दल घडवू देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणाची तरी फूस आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगेखोरांना अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अकोला आणि शेगाव या दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. पोलिस पूर्ण अलर्ट मोडवर होते. जसे लक्षात आले की, अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सगळीकडची पोलिस कुमक त्या ठिकाणी पोहचली. दंगली घडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के जाणूनबुजून होत आहेत. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत. आणि अशाप्रकारे जे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काही लोक आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे बाहेर आणणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना घेराव करू. आम्ही त्यांना चालू देणार नाही. आम्ही त्यांना फिरू देणार नाही, असे काही जण म्हणत आहेत. मात्र, हे कुठल्या लोकशाहीत बसणारे आहे. अशा दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल, तर तुमचा मुद्दा मांडा. कुठेतरी तुम्हाला माहिती आहे की, तुमची बाजू कमकुवत आहे. म्हणून अशा प्रकारची भाषा वापरणे सुरू आहे.

विधानसभेचे अध्यक्ष एक निष्णात वकील आहेत. कायदा समजणारे आहेत. वर्षानुवर्ष प्रॅक्टीस केलेले आहेत. ते कुठलेही बेकायदेशीर काम करणार नाहीत. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाइम म्हटलेले आहे. रिझनेबल टाइमचा अर्थ देखील स्पष्टपणे अध्यक्षांना समजतो. त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत.