लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, बारामती 38, धाराशीव (उस्मानाबाद) 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23, हातकणंगले 27 अशी आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एकूण 38 उमेदवार आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक संघटना आणि अपक्ष लढणार निवडणूक. बारामतीमध्ये मुख्य लढत होणार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल होती शेवटची मुदत होती.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदार संघासाठी २८ उमेदवारांची ४० नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननी दरम्यान सात उमेदवारांचे अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांची २८ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहीली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ जणांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे अंतिमतः १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत.