विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : भारतातील अर्ध्याहून अधिक हिंदूंनी प्रयागराज येथे येऊन महाकुंभात पवित्र स्नान केले आहे. अंतिम टप्प्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (More than half of the country’s Hindus take a holy bath in the Mahakumbha)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे . मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी, १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ बुधवारी, २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.
भारतातील १.१० अब्ज म्हणजे 110 कोटी सनातन धर्मीयांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. महाशिवरात्रीच्या अमृत स्नानापर्यंत ६५ कोटी सनातनी भाविकांनी स्नान केले असेल. या महाकुंभामध्ये कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यामधील सर्वात मोठा सहभाग दिसून आल्याचे उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या आकडेवारीनुसार, सध्या भारताची लोकसंख्या १४३ कोटी असून त्यामध्ये ११० कोटी हिंदू धर्मीय आहेत. प्यू रिसर्चच्या माहितीनुसार जगभरात हिंदू धर्मीयांची संख्या १.२० अब्ज इतकी आहे. उत्तर प्रदेशने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ५० टक्के हिंदू भाविकांनी आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. एकट्या नेपाळमधून ५० लाख भाविकांनी स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. त्याशिवाय जगभरातील ७३ मुत्सद्दी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्रिवेणी संगम स्नान केल्याचे राज्य सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक आठ कोटी भाविकांचे स्नान, मकरसंक्रातीला ३.५० कोटी, पौष पौर्णिमेला १.७ कोटी वसंतपंचमीला २.५७ कोटी, माघ पौर्णिमेला २ कोटी भाविकांनी स्नान केले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार,१८ फेब्रुवारीपर्यंत ५५ कोटी तर२२ फेब्रुवारीपर्यंत ६० कोटी भाविक प्रयागराज येथे आले होते. महाशिवरात्री पर्यंत ६५ कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा आहे. ही संख्या यापूर्वीच्या कोणत्याही कुंभमेळ्याच्या तुलनेत अधिक आहे, अशी माहिती प्रशासनाने निश्चित केली आहे.
महाकुंभाच्या शुभ मुहूर्तांनुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा यमुना संगमावर भाविकांची सर्वाधिक गर्दी होती. सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सेवा, आणि वाहतूक यंत्रणेसाठी प्रशासनाने चोख तयारी केली होती. पोलीस, एनडीआरएफ, आणि सेवाभावी संस्थांनी भक्तांच्या सोयीसाठी दिवसरात्र काम केले.
भव्य स्नानासाठी २०० हेक्टरमध्ये पसरलेल्या मेळ्याच्या क्षेत्रात १.२ लाख शौचालये, १०० आरोग्य केंद्रे, आणि डिजिटल मॉनिटरिंगची सोय होती. नदी प्रदूषण रोखण्यासाठी “ईको-फ्रेंड्ली” स्नानाचा आग्रह धरला गेला.
६० कोटी भाविकांची श्रद्धा ही भारताच्या आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे,” असे श्रीमंत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले.
१२ वर्षांतून एकदा भरलेला महाकुंभ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रा मानली जाते. प्रयागराज येथील गंगा-यमुना-सरस्वती संगमावर “शाही स्नान” धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
