विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमआयएमचे नेते ओवेसी बंधू यांनी पंधरा मिनिटांसाठी पोलीस बाजूला करा असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देत प्रतिआव्हान देणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स पाठवले आहे. ( Hyderabad court summons Navneet Rana to respond to Owaisi brothers’ challenge)
नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिले होतं. त्या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणांनी उपस्थित राहावे असे आदेश आहेत.लोकसभेच्या निवडणूक प्रचारात 8मे 2024 रोजी हैदराबादमध्ये प्रचारसभेत बोलताना, 15 सेकंद पोलिसांना हटवावे असे वक्तव्य करत त्यांनी ओवैसी बंधूंना आव्हान दिलं होतं. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवनीत राणा गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील.”
