आम्ही शिवरायांचे मावळे, हार मानणार नाही, अरबी समुद्रातील स्मारक उभारणारच, मुख्यमंत्र्यांचा दृढ निश्चय

विशेष प्रतिनिधी

रायगड : आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. अरबी समुद्रातील स्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. पण आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवले आहे. सरकार हा खटला हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळे करून घेईल. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे हा प्रयत्न आपला असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ( We the descendants of Shivaji will not give up we will build a monument in the Arabian Sea the Chief Ministers firm determination

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी रायगडवर अभिवादन केले. यावेळी खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या केल्या. उदयनराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले. काही पर्यावरणीय आणि बाकी गोष्टींमुळे ते काम थांबले आहे. मुंबईत राज्यपाल भवन येथे 48 एकर जागा अरबी समुद्राला लागून आहे. तेथे शिवरायांचे स्मारक व्हावे, ही अनेकांची मागणी आहे.
त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचे स्मारक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असल्याचा निश्चय व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी केली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे. मी अमित शहा यांना मदत करण्याची विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून नॉमिनेट केले आहे. आता 18 ते 21 या कालावधीत फ्रान्समध्ये युनेस्कोपुढे आमचे सादरीकरण होणार आहे. मी व आशिष शेलार तिकडे जाणार आहोत. मला विश्वास आहे की, आपले 12 किल्ले हे केवळ भारताचा नाही तर विश्व वारसा म्हणून दर्जा प्राप्त होईल.

महाराष्ट्रातील आपले सरकार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी काम करताना आमच्यासमोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श व भारताचे संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचे सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो, असेही ते यावेळी म्हणाले.