विशेष प्रतिनिधी
मुंबई : परिवर्तन महाशक्ती नावाने एकत्र आलेल्या नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. जनतेने त्यांना पूर्ण नाकारले. आता या दमलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची तयारी सुरु केली आहे. आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणारे आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांचा त्यामध्ये समावेश आहे. (Tired leaders unite again in the name of youth struggle)
आजपर्यंत कोणत्या तरी आघाडीच्या वळचणीला राहून राजकारण करणाऱ्या या नेत्यांच्या मर्यादा विधानसभा निवडणुकीत उघड झाल्या होत्या. राज्यातील ९ घटक पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती उभारली होती. . या महाशक्तीचे १२१ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील व महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल, अशा वल्गना महाशक्तीच्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे.परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले स्वराज्य पार्टीचे छत्रपती संभाजी महाराज, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्तीचे आ. बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, खोरिपाचे उपेंद्र शेंडे यांचा त्यात समावेश होता, मात्र या परिवर्तन महाशक्तीला एकही जागा मिळू शकली नाही. अगदी बच्चू कडू यांचाही पराभव झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला. तिन्ही पक्षांना मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन केले आहे.
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे. त्याची चुणूक त्या आघाडीच्या टॅगलाईनमधून दिसून आली. या परिषदेत सत्ताधाऱ्यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.
खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली “युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५” चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आघाडी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार का? हे येत्या काळातच दिसून येणार आहे.
