विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सौदी अरेबिया दौऱ्याच्या प्रारंभालाच अनोख्या आणि ऐतिहासिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. त्यांच्या विमानाने सौदी हवाई हद्देत प्रवेश करताच, सौदी लष्कराच्या अत्याधुनिक एफ-15 आणि टायफून जेट फायटर विमानांनी त्यांच्या विमानाला एस्कॉर्ट दिला. (PM Narendra Modi receives grand welcome in Saudi Arabia Royal honours including jet fighter escort)
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जेद्दाह येथे दाखल होत आहेत. सौदी क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत असून, २०१६ आणि २०१९ नंतरचा हा मोदींचा सौदीमधील तिसरा दौरा आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२३ मध्ये G20 परिषदेच्या निमित्ताने मोहम्मद बिन सलमान यांनी भारताचा दौरा केला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील उच्चस्तरीय राजनैतिक संबंध अधिकच दृढ झाले आहेत.
या दौऱ्यादरम्यान, भारत-सौदी अरब धोरणात्मक भागीदारी परिषद (Strategic Partnership Council) ची दुसरी सहअध्यक्षीय बैठक मोदी आणि मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत होणार आहे. अंतराळ, ऊर्जा, आरोग्य, विज्ञान, संस्कृती, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये किमान ६ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) साइन होणार आहेत, तर इतरही करार प्रक्रियेत आहेत. अर्थव्यवस्था, संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक राजकीय आव्हाने या मुद्यांवरही विस्तृत चर्चा होणार आहे.
सौदी अरेबियातील २५ लाखांहून अधिक भारतीय नागरिकांसाठीही ही भेट महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या कल्याण, सुरक्षा आणि रोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. यासोबतच ऊर्जा सुरक्षेचा विषय, विशेषतः ग्रीन एनर्जी आणि हायड्रोजन तंत्रज्ञानासंबंधी भागीदारी, महत्त्वाचा अजेंडा आहे.
या दौऱ्यापूर्वी अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाचे वर्णन “भारताचा विश्वासू मित्र, धोरणात्मक भागीदार आणि सर्वात मूल्यवान भागीदारांपैकी एक” असे केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “भारत आणि सौदी अरेबियामधील भागीदारीला अमर्याद शक्यता आहेत.”
सौदी लष्कराने विमानाला दिलेल्या एस्कॉर्टबाबत ‘India-Saudi ties soaring high’ या शीर्षकासह एक खास व्हिडीओ क्लिपही त्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. अशा स्वरूपाचा सन्मान आजवर केवळ अमेरिकेचे राष्ट्रपती, रशिया किंवा चीनसारख्या महाशक्तींनाच दिला गेला होता. त्यामुळे भारतासाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी हा क्षण अत्यंत गौरवाचा आहे.
हा दौरा केवळ परंपरागत औपचारिकता न राहता, भारत-सौदी संबंधांचा एक नवा युगाचा प्रारंभ ठरणार आहे. उभय देशांतील विश्वास, सहकार्य आणि सहधर्मशीलतेचा हा नवा अध्याय भारताच्या जागतिक स्थानाला अधिक बळकट करणारा ठरणार आहे.
