फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना भेट; हिस्सामोजणी अवघ्या 200 रुपयांत, भाऊबंदकीचे वाद टळणार

विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेत फडणवीस सरकारने हिस्सेवाटप मोजणीचा खर्च अवघ्या 200 रुपयांवर आणला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
( Fadnavis governments gift to farmers Land counting for just Rs 200 sibling disputes will be avoided)

मोजणीसाठी आकारली जाणारी हजारो रुपयांची फी कमी करण्यात आली आहे. जमिनीच्या हिस्सेवाटपातील अडथळे आणि भाऊबंदकीचे वाद यामुळे टळण्याची शक्यता आहे. हिस्सामोजणीसाठी होणाऱ्या खर्चामुळे अनेक कुटुंबात मोजणी करण्यात येत नव्हती. यामुळे नंतर कुटुंबात वाद होत होते.

यापूर्वी, जमिनीच्या हिस्सामोजणीसाठी एक ते चार हजार रुपये शुल्क आकारले जात होते. त्यात आता मोठी कपात करण्यात आली असून केवळ 200 रुपये भरून नोंदणीकृत वाटणीपत्र आणि अधिकृत नकाशा मिळणार आहे.

बावनकुळे यांनी सांगितले की, “हा निर्णय शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आहे.” शेतकऱ्यांना जमिनीच्या अधिकृत नकाश्यामुळे भविष्यातील खरेदी-विक्री व्यवहार तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मदत होणार आहे.

साध्या मोजणीसाठी सहा महिने आणि 1000 रुपये, तातडीसाठी दोन महिने आणि 2000 रुपये, अतितातडीसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता ही प्रक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारी ठरणार आहे.

या निर्णयामुळे जमिनीचे हक्क स्पष्ट होतील, दस्तऐवजीकरण सोपे होईल आणि कुटुंबातील वादांना आळा बसेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.