विशेष प्रतिनिधी
इगतपुरी : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन केवळ विकासाच्या गाडीला गती नव्हे, तर प्रत्यक्षातही 120 किमी/तास वेगाने मुख्यमंत्र्यांनी गाडी चालविली. ( Chief Ministers Samrudhu Drive a message of development at the speed of 120
राज्याला वेगाने विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षातही 120 च्या स्पीडने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सारथ्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेगवान आणि विशेष प्रवासाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले , “समृद्धी महामार्गावरून जाण्याच्या प्रवासात गाडीचं सारथ्य प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री फडणवीस होते आणि मी मागच्या सीटवर.
येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. हे सांगताना अजित पवार हसत म्हणाले, “ त्यावेळी मी म्हणालो, हे बाबा गाडीवर बसल्यावर ही गाडी चालणार नाही. त्यामुळे आपण लँड क्रूझर घेऊया. लँड क्रूझर गाडी निरंजन डावखरे यांची होती. देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवायला घेताच गाडीने 100 चा स्पीड घेतला. मग 120 च्या स्पीडने गाडी जाऊ लागली. टनेल येईलपर्यंत गाडीचा स्पीड 120 होता. पण टनेल सुरू झाल्यावर 100 स्पीडवर गाडी आली, कारण टनेलमध्ये 100 स्पीडचा नियम होता. असं नियमांचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही येथे पोहोचलो.
या संपूर्ण प्रवासातून मुख्यमंत्र्यांनी जणू राज्यातील जनतेला संदेश दिला की महाराष्ट्राचा विकास वेगात सुरू आहे, आणि तोही सुरक्षितपणे व नियमानुसार!”
