विशेष प्रतिनिधी
बालाघाट : मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील पचामा या डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. चकमकीनंतर घटनास्थळी स्फोटके, रॉकेट लाँचर, रायफल व काडतुसांचा मोठा साठा सापडला असल्याची माहिती विशेष पोलिस महासंचालक (नक्षलवाद विरोधी पथक)पंकज श्रीवास्तव यांनी दिली. ( Encounter in Balaghat 4 Naxalites killed large cache of arms including rocket launcher seized)
“बिठली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पचामा डोंगर रंगतभागात झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून, त्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. घटनास्थळी एक हँड ग्रेनेड, एक रॉकेट लाँचर, .३१५ रायफल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत,” असे श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्था सांगितले.
चकमकीनंतर काही नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा दलांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेला दुजोरा देताना राज्याच्या नक्षलमुक्तीचा पुनरुच्चार केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याच संकल्प केलेला आहे. आज बालाघाटमध्ये झालेल्या चकमकीत ३ महिला आणि १ पुरुष अशा ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्या जवळून रॉकेट लाँचरसह विविध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे,” असे यादव यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना शासनामार्फत योग्य तो सन्मान आणि बक्षीस दिले जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, यापूर्वीही छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कुकानार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. या ठिकाणाहून देखील स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली होती, अशी माहिती सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
