‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे निर्माते शिल्पकलेचे भीष्माचार्य राम सुतार यांचे निधन

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 1.30 वाजता त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ( Bhishmacharya Ram Sutarsculptor and creator of Statue of Unity passes away)

दीर्घायुष्य लाभलेले राम सुतार हे अखेरपर्यंत सृजनशीलतेशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवला.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच एकता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरलेले पुतळे ही त्यांची अमूल्य देणगी मानली जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, कला क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

जगभरात 200 हून अधिक शिल्पांची निर्मिती त्यांनीकेली. दिल्लीतील संसद भवन परिसरात उभारलेली त्यांची शिल्पे विशेष प्रसिध्द आहेत. राम सुतार यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हा पुरस्कार त्यांच्या हाती सोपवला होता. या भेटीदरम्यान राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायले होते.अलीकडेच अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, तो पुतळादेखील राम सुतार यांच्या कलाकृतीचा भाग होता. त्यांच्या शिल्पांमधील सूक्ष्म बारकावे, भावभावना आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या कलेची ओळख होती.
राम वनजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे धडे घेतले. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून औपचारिक शिक्षण पूर्ण केले. 1959 साली त्यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही वर्षांतच त्यांनी शासकीय सेवा सोडून पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी आपल्या कलेचा स्वतंत्र प्रवास सुरू केला.

जगातील सर्वात उंच, 182 मीटर उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा राम सुतार यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. या शिल्पाच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंत संपूर्ण सर्जनशील वाटचाल त्यांनीच केली. सुमारे 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली. संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, तसेच तिच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया येथे पोहोचल्या. 1953 साली मेयो गोल्ड मेडल मिळवणारे राम सुतार हे केवळ शिल्पकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे जागतिक प्रतिनिधी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *