दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’ येण्यास विरोध करत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाची खिंड लढवणारे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी खासदार यांच्याकडे सादर केला. जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
( Opposing NCP UnitySharad Pawar Factions Pune City Chief Prashant Jagtap Resigns)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पक्षाकडून समिती गठित करण्यात आली आहे. या समितीतून जगताप यांना वगळण्यात आले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक ठळक झाल्याचे दिसून आले.
प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीत शहर संघटनेतील अस्वस्थता, आगामी निवडणुकांची दिशा आणि पुण्यातील कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. अखेर या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेतृत्वाकडून या राजीनाम्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना स्थानिक पातळीवर विरोध वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *