धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासह राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा धर्मवीर दिघे यांनी सुरू केली होती, त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु श्री.दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. जितो ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे.