शिर्डीत पंतप्रधानांच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता होणार वितरित

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील.पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो’ योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती.

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, खात्यांना आधारची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती. पंधराव्या हप्त्यासाठी हे निकष बंधनकारक आहेत. राज्याच्या योजनेसाठीही हे निकष लागू केले आहेत. पीएम किसान योजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी ८५ लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता दिली होती.राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टलसारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवारी जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दर्शन घेऊन नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.

कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पुढाकार घेऊन कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत. पी एम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पी एम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे. पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने विशेष मोहीम राबविली होती.