अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् पटोलेंच्या पायाखालची सरकली वाळू!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली अन् त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याचे कारण म्हणजे पटोले यांच्या विरोधातील खदखद चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. विदर्भातील प्रमुख नेत्यांपासून माजी प्रदेशाध्यक्षांपर्यंत अनेकांनी आत्तापर्यंत पटोले यांच्याविरुध्द तक्रारी केल्या. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतली नाही. आता चव्हाणांच्या राजीनाम्याने संपूर्ण महाराष्ट्र कॉग्रेसच संपू शकते, असे वातावरण तयार झाले आहे.

पक्षत्यागानंतर बोलताना चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. पण प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे चालले होते, असे चालले होते. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती. पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन होत नव्हते. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते, असे म्हणत नाना पटोले यांच्यावरील नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली होती.

आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पहायची? टीमवर्क दिसत नव्हते. पक्षात काही बदल घडवून आणण्यासाठी खूप उशीर झालेला होता, सांगून अर्थ नाही असे मला वाटले. काही चांगले बदलच दिसत नव्हते. साचेबद्धपणा आलेला होता. किती वर्षे अशीच वाट पाहायची? किती कोंडी होऊ द्यायची? असा सवालही त्यांनी केला होता.

अशाेक चव्हाण यांच्या थेट आरोपांमुळे नाना पटोले यांच्यावरील नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इतर नेतेही आता बोलायला लागले आहेत. यापूर्वीही सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या विदर्भातील पक्षाच्या नेत्यांनी पटोले यांच्याविरुध्द थेट दिल्लीकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांना हटविण्याची मागणी केली होती.

माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरूनही पटोले टीकेचे धनी झाले होते. सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. त्यांना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला याबाबत विनंती करणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले होते.

सत्यजित तांबेंच्या संदर्भात जे झाले ते चुकीचेच झाले, त्यामुळे पक्ष कमजोर झाला. या प्रकरणात तोडगा काढायला हवा होता. पक्ष अडचणीच्या काळातून जात असताना नेत्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्या, असा सल्ला देत सुनील केदार यांनी पटोले यांच्यावर हल्ला केला होता. काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी नाना पटोले यांना त्यांच्या पदावरून दूर करावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे देशमुख् यांनीही पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पटोले यांच्यामुळे आणखी किती काँग्रेस नेत्यांना नाराज करायचे आणि पक्षत्याग करायला भाग पाडायचे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे एका बाजुला अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागाचा धक्का बसला असताना आता कॉग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पटोले यांच्याविरुध्द आघाडी उघडली आहे. त्यामुळे पटोले यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.