खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’ असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मिनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. ‘गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी’ या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.
ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एसटी बस प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ‘हात दाखवा एसटी थांबवा’ या उपक्रमामुळे लोक आणि एसटीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एसटी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एसटी ला नफ्यात आणू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
