भाजपचे ‘टॉप परफॉर्मर’ नेते यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यावरून विरोधक भाजप नेत्यांना कैचीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नितीन गडकरींच्या उमेदवारीची घोषणा अद्यापही न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेची ऑफर दिली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.
ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान भाजपानं लोकसभा उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये, दरम्यान महाराष्ट्रातील जागा वाटपाचं चित्र कधी स्पष्ट होणार असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता, जागा वाटपासाठी थोडावेळ थांबा आम्ही अधिकृतपणे सांगू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंनी गृहविभागावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी कोणाचं सरकार होतं? किंवा राज्यातील ११३ गोवारींचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हाचं सरकार कोणतं होतं. सुप्रियाताई सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये असल्याने त्या रोज असं वक्तव्यं करतात. त्यामुळे फार एवढं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही,असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात विचारले असता, जेव्हा एखादा मुद्दा न्यायालयाच्या समोर असतो, तेव्हा अशा प्रकारचे निर्देश दिले जातात. आमच्या वेळी मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं. तेव्हा भरती करताना आमच्या अटींच्या अधीन राहून करा, अशा सूचना केल्या होत्या. ही न्यायालयाची प्रक्रिया आहे. मी न्यायालयाचा निर्णय ऐकला नाही, पण माझ्या अनुभवानुसार हे सांगू शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
