सांगली आणि अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सांगली, नगरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. भाजीपाला, आंबा आणि इतर फळांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर शहराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आज राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीये.
जालना जिल्ह्यातही पाऊसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडत असल्यामुळे हवामान खराब झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॅाप्टर उड्डाण करून शकत नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॅाप्टरने जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघीडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते. पुण्यात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार,आदित्य ठाकरे,बाळासाहेब थोरात यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या सभेलाही पावसाचा फटका बसला.
पिंपरी चिंचवड अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरातील काही भागात कोसळला. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात आज शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहेत. या सभेला देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सुमारे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. आकाशात विजेचा कडकडाट सुरु असून शेतकरी वर्गाची पिकं झाकण्यासाठी धावपळ सुरु आहे.विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
